चक्क जाहिरात देऊन विश्वस्त नेमणार !
साईबाबा संस्थान हे विश्वव्यापी भक्त परिवार असलेले धार्मिक स्थळ आहे. यामुळे प्रसिद्धी ,संबंध जोपासण्यासाठी इथे प्रचंड वाव आहे . याच कारणांनी स्थानिक राजकीय नेत्यांसह राज्य सरकारलाही हे देवस्थान आपल्या हाती असावे असे नेहमीच वाटत आले आहे. याच एका विचाराने राज्यसरकारने सिद्धी विनायक व साईबाबा संस्थान या दोन्ही धार्मिक संस्थानचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र कायदा बनविलेला आहे. त्यात पूर्वी विश्वस्थ होण्यासाठीचे नियम हे भक्तांना वाव देणारे होते . २००४ साली राज्य सरकारने या देवस्थानाला राजकीय पुनर्वसन केंद्र करीत आपल्या मर्जीतील विश्वस्त नेमले.
२००४ मध्ये राजकीय विश्वस्त मंडळ आले. त्यांनी संधीच सोन करीत आपापल्या मतदार संघात भाविकांनी दिलेल्या दानाचा उपयोग करून आपली राजकीय प्रतिमा उंचावली. राजकीय वजन वाढविले. तर काही विश्वस्थांनी आपल्या मर्जीतील पात्र अपात्र कर्मचारी भरण्याचा सपाट लावला. त्यातूनच अलीकडे गाजत असलेला ५९८ कंत्राटी कर्मचारी नियमबाह्य कायम करण्याची चर्चा सुरु आहे.
जेव्हा पासून साईबाबा संस्थान वर राजकीय विश्वस्त नेमले जाऊ लागले आहे ,तेव्हापासून रोज नवनवे वाद उपस्थित होत आहे. मागच्या विश्वस्थ निवडीचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. त्यात न्यायालयाने साईबाबा संस्थानचे वाद विवाद कायमस्वरूपी निकाली काढायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने आज एक जाहिरात प्रसिद्ध करून विश्वस्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.राज्य सरकारचा एव्हढा प्रामाणिक प्रयत्न फक्त प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे म्हणून असू शकते. नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न आहेच .
