साईबाबा संस्थान प्रयोगशाळा आहे का ?
जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे माहेरघर म्हणजे शिर्डी ,शिर्डीचे साईबाबा .जेव्हढी मोठी भक्त संख्या तितकी मोठी दानाची रक्कम याठिकाणी जमा होते.याचा विनियोग हा भक्त व परिसरासाठी वरदान ठरला आहे.याचाच एक भाग म्हणजे साईबाबा संस्थानाने सुरु केलेल्या आरोग्यसेवा ,शिक्षण व्यवस्था या आहेत. या व्यवस्था आणखी प्रगल्भ व विस्तारित होण्यासाठी वा करण्यासाठी इथल्या राजकारण्यांनी कधीहि प्रयत्न केले नाही. त्यामुळे इथे सत्ता भोगणारे राजकारण्यानचे स्वतःच्या शिक्षण संस्था ,आरोग्य संस्था या मोठ्या झाल्या. यासोबतच या ठिकाणी येणारे भाविकांना रमण्याची सोया सुविधा देण्याच्या वा त्यांच्या करमणुकीच्या दृष्टीने आजवर प्रयत्न झाले नाही.व जे झाले ते अत्यंत संकुचित दृष्टिकोनाने स्वार्थाने बरबटलेले होते त्यामुळे ते पूर्णत्वाला जाऊ शकले नाही.याच संकुचित विचारामुळे शिर्डीचे साईबाबा जगात पोहचले आहे .शिर्डी मात्र अवघ्या दिड किलोमीटरच्या त्रिजेत सामावलेली आहे.
हि मानसिकता कधी बदलणार
दरम्यान इथे येणारे सरकारी अधिकारी यांनी आपण साईबाबाची सेवा कारण्यासाठी इथे आलो आहोत. असे बोलून नुसते प्रयोग केले. ते कुठलेही आपला प्रभाव टिकावू शकले नाही.या सरकारी यंत्रणेत काही अधिकाऱ्यांत एक सारखा विक्षिप्त पणा आहे. नियुक्तीच्या ठिकाणी गेले कि सरकारी निवासाचे नूतनीकरण करायचे आणि जनतेचा पैसा उधळायचा.याला पायबंद कोण घालणार हा अनुत्तरित प्रश्न आहे.काही अपवाद वगळता संस्थानात नियुक्त अधिकाऱ्यानी संस्थानाने देऊ केलेले निवास्थानांच्या नूतनीकरणात लाखो रुपये खर्ची घातले. त्यांच्या या कृतीने साईबाबा संस्थांनच्या मुरब्बी मंडळींनी त्या अधिकाऱ्याला लगेच गुरफटले.असे अनेक अनुभव परिसराला आहेत.
तोडफोड म्हणजे विकास हा चुकीचा विचार रुजवला जात आहे.
अलीकडे तर इथे अधिकारी आले ,कि काहीतरी तोडफोड केलीच म्हणून समजा. दर्शन रांगासाठी बांधकाम होणार होते हे माहित असूनही साई मंदिर परिसरात मार्बल लावण्याचा केलेला द्राविडी प्राणायाम आज काय अवस्था आहे,पंचवीस ,तीस टक्के मार्बल उखडून काढावा लागला आहे. आता तो फेकून दिला जाईल ज्यासाठी लाखो रुपये खर्च झालेले आहे.आता जनसंपर्क विभागाजवळील विश्वस्त कक्षाची तोडफोड केली. तिथे सार्वजनिक शौचालय बनविण्याचे काम सुरु. या मागचे मुख्य कारण या परिसरात पत्रकारांची वर्दळ असते. त्यामुळे तथाकथित अतिविशिष्ट भाविकांच्या सेवेत पायघड्या घालण्यास अडथळा येत होता.किती भंपक तर्क लावून हा विकास केला जात आहे.हे काम एक सुटकेस घेऊन येथे उच्च अधिकारी म्हणून नियुक्त झालेला अधिकारी करीत आहे. इतका त्यागी अधिकारी या परिसराने पाहिलेला नाही.तरीही त्याच्या मनात इतकी प्रभावी सूडभावना याबाबत आश्चर्य वाटते. वास्तविक पाहता जी दर्शन रांग बांधली जात आहे. ती मूलभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असताना हे शौचालय बांधून साईबाबा संस्थानातं भाविकांनी दिलेला दानाचा पैशाची उधळपट्टी केली जात आहे.यावर कोण जाब विचारणार ? नवीन निर्माण हा विकास असू शकतो पण नूतनीकरण हि पळवाट आहे. याबाबत गंभीरतेने विचार होणे गरजेचे आहे.
आपलं नाव राहावं म्हणून या चुका
इथे नियुक्त अधिकारी आपलं नाव कायम राहावं या उद्द्येशाने नवनवे प्रयोग करतात. अन नेमकं संकुचित व स्वार्थी लोकांच्या संपर्कात येऊन हे उद्द्योग करतात. त्यामुळे बदनामही होतात व दानाच्या पैशाची उधळपट्टी करून निघून जातात. आज मितीला जे विकास प्रकल्प रखडलेले आहेत ते सर्व याच कार्यपद्धतीची उदाहरणे आहेत.
काय करण्यासारखं आहे ?
शिर्डीत बहुमजली वाहनतळ केले जाणे गरजेचे आहे. ते होऊ शकते. प्रशस्त असे एक हजार खाटाच मेडिकल रिसर्च सेंटर केले जाऊ शकते.ज्या माध्यमातून एम डी ,एम एस अभ्यासक्रम सुरु केला जाऊ शकतो. साईबाबांच्या नावाने विद्यापीठ सुरु करून बालवाडी ते पी एच डी पर्यंत शिक्षण संस्था विशेष सवलतीसह सुरु केले जाऊ शकते. विदेशी भाविकांसाठी अद्ययावत असे भक्त निवास केले जाऊ शकते. संपूर्ण शिर्डीत मोफत बस सेवा पुरवली जाऊ शकते. कुठलाही उपक्रम इतका प्रशस्त असावा तो बघायला किमान दोन दिवस लागले पाहिजे. तेव्हा भाविक इथे खिळून राहील.
कोरोना संकटानंतरचे दळणवळण गतिमान व स्वस्त होणार
या कोरोना संकटानंतर देशयातील दळणवळण आणखी गतिमान होणार आहे. याचा जसा फायदा होणार आहे.तसा तोटाही होणार आहे. याबाबत आजच जागृत होणे गरजेचे आहे. आणि हा तोटा शिर्डीकरांचा मोठ्या प्रमाणावर होणार आहे.भाविकांना परतीच्या प्रवासाचे माध्यम स्वस्त व सहज उपलब्ध होतील. आगामी काळात शिर्डी ते अहमदनगर तसेच शिर्डी ते मनमाड या मेमो डेमो रेल्वे एक तासाच्या अंतराने धावणार आहेत.