साई जीवन दूत

वर्दीतील माणूस संवेदनशील योजना राबवतो तेव्हा …


शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे व उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे या दोघांनी साईंच्या शिर्डी परिसरात होणारे अपघातात पीडिताला त्वरित उपचार मिळावा यासाठी साई जीवन दूत नावाची संकल्पनेला साकारण्याचे काम केले आहे. येत्या गुरुवारी या संकल्पनेचा पहिला मानकरी ठरलेल्या नागरिकाला रोख बक्षिसासह ,प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे.

शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नीतीन गोकावे यांनी शिर्डी परिसरातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला.यावेळी अपघात ग्रस्तांत साईभक्तासह परिसराचे नागरिक असतात. त्यांना मदतही मिळते. परंतु ही मदत मिळताना काही वेळा उशीर होतो. तो होऊ नये व त्याची कारणे काय याचा अभ्यास करताना मदत करू इच्छिणारांना पोलिस कार्यवाही बाबत असलेले संभ्रम दूर करण्यासाठीही उपाय योजना तयार केली.यासोबतच साई जीवन दूत या संकल्पनेला आकार आला आहे.

काय आहे हि साई जीवन दूत संकल्पना ?

या संकल्पनेत पहिल्या अवस्थेत शिर्डी परिसरात कुठेही अपघात झाला ,कि त्यात जखमींना दवाखान्यात पोहचविणारे नागरिकाला सन्मानित करायचे. यातून त्याला रोख बक्षीस ,साई जीवन दूत हे गौरव पत्र ,एक मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्या सोबतच त्या पीडितेला घेऊन जाणारा वाहन चालक ,रुग्णवाहिकेचा चालक यालाही गौरवपत्र,मानचिन्ह देण्याची संकल्पना आहे. याशिवाय वर्ष भरात सर्वाधिक मदत करणारे साई जीवन दूत हे पुन्हा सन्मानित केले जातील.

यासाठी पैसे कसा उभा करणार कसा खर्च करणार ?

    या संकल्पनेला योगदान देणारांकडून एका वेळेला   फक्त शंभर रुपये स्वीकारले जाणार. ते एका बँक खात्यात ठेवले जातील.त्या बँक खात्याचा भारत कोड सार्वजनिक केला जाईल यातून कुणीही नागरिक यात शंभर रुपये योगदान देऊ शकेल. त्या बँक खात्यातून या योजनेच्या मानकऱ्यांना धनादेशाचे बक्षिसाची रक्कम दिली जाईल. यातून गौरवपत्र ,मानचिन्ह ,कार्यक्रमाचा खर्च हा सर्व धनादेशाचे अदा केला जाईल.यातून पारदर्शकता व प्रामाणिकतेचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठीची काळजी घेतली जाणार आहे. 

या योजनेचे संचालन कोण करणार ?

या योजनेत शिर्डी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक ,उपविभागीय पोलीस अधिकारी ,यांचा सहभाग असला तरी ते कुठल्या पदावर असणार नाहीत. स्थानिक पत्रकारापैकी काही सदस्य ,तसेच अराजकीय स्थानिक नागरिक,सामाजिक कार्यकतें हे या समितीचे अध्यक्ष ,सचिव ,सदस्य असतील.

काय होईल या साई जीवन दूत ने ?

या संकल्पनेच्या अंमलात येण्याने रस्त्यावर व एखाद्या सार्वजनिक दुर्घटनेत वेळेवर मदतीला धावणारे आजवर पडद्या मागे राहिले आहेत. पण त्यांनी चांगले काम सुरु ठेवले आहे.त्यांचं अनुकरण करायला लोक पुढे येतील.पोलिसांचा व नागरिकांचा संवाद होईल.यातून अपघात स्थळी मदत केली तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो हा गैरसमज दूर होऊन ज्यास्तीत ज्यास्त लोक मदतीला धावून येतील.सर्वात महत्वाचे म्हणजे अपघातात जखमी हा “गोल्डन अवर ” मध्ये दवाखान्यात पोहचेल व त्याला उपचार सुरु होऊन त्याचा जीव वाचण्याची शक्यता वाढेल.यातून कुटुंबावर होणार आघात टळेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *