कोरोना संधी कुणासाठी
२०२० हे वर्ष समस्त मानव जातीसाठी काळ बनून समोर आले आहे. आज सप्टेंबर सुरु झालाय.गेल्या चार पाच महिन्यात काही लाख कुटुंब घराच्या अंगणात आले नाहीत. काही लाख पोलीस ,स्वच्छता,चालक ,कर्मचारी रस्त्यावर कार्यरत आहेत. काही लाख वैद्यकीय सेवा देणारे आपल्या घरापासून दूर आहेत. हे सार जग एका विषाणूच्या संसर्गाच्या भयाने ग्रासलं आहे. तरीही एक खंत आहे. ती म्हणजे आम्ही आपल्या लोकांना वाचविण्यासाठी खरोखर प्रामाणिक प्रयत्न केला आहे का ? हा प्रश्न अनुत्तरित नाही तर आपल्या असफलतेला विशद करणाऱ्या उत्तराने पूर्ण होतो.याच आत्मचिंतन करून आपल्या सरकारने आता तरी सावध व्हायला हवं आहे. तस झालं नाही तर या जीवघेण्या संकटाला संधीच सोनं करू पाहणारांना येणार काळ आणि पुढच्या पिढ्या माफ करणार नाही.यासोबत सर्व सरकाराना याची झालं बसणार आहे.
काय चुकतंय ?
मी मागच्या लेखात उल्लेख केलाय आपली तुलना चुकलीय,परिणामी दिवसाला गंभीर होणार संकट सहज पेलवू शकलो असतो.आज खऱ्या अर्थाने टाळेबंदीची गरज आहे. कारण अगदी खालच्या स्तरावर आमच्या सरकारने कुठलीच उपाय योजना कार्यान्वित केलेली नाही.नुसता देखावा आहे. कालच उदाहरण आहे. आमचा एक पत्रकार मित्र सकाळी त्रास होऊ लागल्याने रॅपिड केली,ती पॉझिटिव्ह आली. श्वास घ्यायला त्रास होत होता. जवळचा दवाखाना पाहून तिथे गेले तर तिथला अनुभव हा अत्यंत वेदनादायी होता. आधी चाळीस हजार भरा तर आत घेतो,या संवादाने सुरुवात झाली. इकडॆ रुग्ण एका एका श्वासागणिक त्रासिक होतोय त्याचा या मंडळींना काहीच फरक पडत नव्हता.एक पत्रकार म्हणून फोना फोनी सुरु झाली. मित्र परिवाराने आपल्या परीने उपचार सुरु करण्यासाठी पर्याय वापरायला सुरुवात झाली.जिल्हाधिकारी ,आमदार ,खासदार ,संस्था चालक याचा प्रभाव पडायला दोन तास उलटले.दरम्यान नातेवाईकांनी रुग्नांच्या खात्यात चाळीस हजार रुपये टाकले.त्यांचा प्रभाव पडला उपचार सुरु झाले.असं वाटत होत. पण दिड दोन तास ऑक्सिजन देऊन रुग्नाला पुण्याला हलविण्याचा निर्णय घ्यावा लागला.दुपारी साडे चारच्या सुमारास पुण्याचा प्रवास सुरु झाला.तिथे पोहचल्यावर जम्बो हॉस्पिटल मध्ये जागा मिळाली. तीही आयुक्त,खासदार,पालकमंत्री यांच्या फोनाफोनी नंतर झालं. हे सर्व एका सामान्य परिवासराला शक्य आहे का ? त्याच्या साठी “बेवारस ,सामान्य असण्याचा मृत्यू ” हाच जवळचा मार्ग आहे.हे अगदी कालच उदाहरण आहे. अजून आमचा मित्र धोक्यातून बाहेर आलेला नाही. हे उदाहरण का दिलंय ? त्याच उत्तर बघा एखादा रुग्ण आपल्या हॉस्पिटलच्या दारात येतो,दोन तास त्याचा आरोग्य विमा आहे हे सांगतो ,दहा हजार रुपये भरायला तयार होतो .सरकारने सर्वासाठी कोरोनाचा उपचार घेताना महात्मा फुले जीवनदायी लागू असल्याची घोषणा केली आहे .मग का उपचार मिळत नाही ? हे कुणाला विचारायचं ? हा नियोजनशून्य कारभार अर्धवट वा विकृत व्याख्या करून केलेले आदेश व त्यांच्या अंमलबजावणीची सक्ती याचा परिणाम आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही सुधारणा करा संकट वाढतंय
याच एका उदाहरणात सर्व काही स्पष्ट होत,आमच्या मित्राला उपचार सुरु का ? झाला नाही. सरकारने ते हॉस्पिटल ताब्यात घेतलेले आहे.त्यांना सरकारने काय दिलय ? सी ,बी व्हिटॅमिन ,पॅरासिटामोल यावर रुग्ण बरे करू पाहताय सरकार. ऑक्सिजन आहे,ते द्यायला यंत्रणा कोण पुरवणार ? हॉस्पिटलची यंत्रणा दोन महिने झाले तिथल्या स्टाफच्या पगाराची सोय कोण करणार ? हि झाली हॉस्पिटलची बाजू दुसरी बाजू सरकारची ती कशी काम करते? जर सर्वासाठी महात्मा फुले जीवनदायी अंतर्गत कोरोनाचा मोफत उपचार होणार आहे तर रुग्ण दोन तास तिष्टत का ? ठेवतात .हे सरकारने पाहायला नको.उपचाराची सक्ती करायला नको.अहो आज आमच्या जिल्ह्याची जरी वास्तविकता पहिली तर किती व्हेंटिलेटर आहेत ? ती संख्या पंचेचाळीस लाख लोकसंख्येला पुरेशी आहे का ? ती यंत्रणा खाजगी डॉक्ट्ररांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात किमान चार तरी उपचार केंद्र सुरु करणे गरजेचे आहे. सर्व जिल्ह्यातील रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी गेले तर तिथे अतिरिक्त ताण वाढतो आहे. तेही हतबल होणार आहेत.आज मितीला राज्यातल्या शेकडो ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टर नाहीत. जे काही आहेत ,नको तिथे तीन तीन डॉक्टर नेमून ठेवलेले आहेत कि जे बदली ,नेमणुकीचे लागेबांधे सांभाळणारे आहेत. असे शेकडो सरकारी दवाखाने आहेत कि जेथे एक्सरे काढायला माणूस नाही असे आहेत. काही ठिकाणी नर्स नाही, स्टाफ नाही. हे वास्तव या संकटात भयानक रूप घेऊन उभं ठाकलं आहे.याच मुख्य कारण धोरण ठरवणारे हे अवैद्यकीय, फक्त कागदी आदेशाची अंमलबजावणी करून घेणारे मत्सद्दी,अधिकारी राजकारणी हे आहेत.त्यांना विनाकारण स्वायत्तता व स्वातंत्र्य देऊन ठेवल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. आमच्या सरकारने डॉक्टरांची टीम फक्त मुंबई साठी नेमलीय का ? आता विमा कंपन्यांची बाजू पाहू या कंपन्यांचे नियमन करणारी विमा प्राधिकरण नियामक संस्था( IRDA) हि कश्यासाठी व कोणासाठी काम करते? या संस्थेने आरोग्यविमा नियम पारदर्शी व सहज सुलभ करायला नको ? एकदा आरोग्यविमा घेतला कि तो कुठल्याही दवाखान्यात जावो उपचार हा पैशाशिवाय सुरूच झाला पाहिजे.त्या नागरिकाला का तो मनस्थाप तर IRDA नावाची नालायक संस्था हि जनते पेक्षा विमा कंपन्यांचे किचकट पळवाटांचे नियम अबाधित ठेवण्यासाठी निर्माण केलेली रचना आहे .मला वाटत हे पुरेस आहे संकटच गांभीर्य समजून घ्यायला. कारण आणखी सविस्तर लिहायला गेलं तर पुस्तक छापून होतील चुकांची पण ती वाचणार कोण ? व कोण सुधारणा करणार हा प्रश्नच आहे.
कोरोनाला समजून घ्या ,त्याच खर रूप आता दिसू लागलंय
आता पर्यंत आम्ही ज्या टाळ्या वाजवल्या त्या कोरोनातुन शंभर टक्के वाचणारच होते त्यांच्यासाठी वाजवल्या आहेत. हि बाब समजून घ्या. कोरोना कुणालाही कधीही होऊ शकतो आहे.त्याला कुणाचं पथ्य नाही.ज्याला श्वास घ्यायला त्रास होईल त्यालाच त्या श्वासाची किंमत कळते. ती योजना राबविणारे व त्यात क्लिष्टता निर्माण करणारे याना कधीच कळू शकत नाही. तेव्हा स्वतः ला जितकं सुरक्षित ठेवता येईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करा. मास्क वापर ,हाथ धुण्यासाठी साबण वापरा. तोंडाला हाथ लावण्यापूर्वी हाथ स्वच्छ पाणी व साबणाने धुवा. तूर्तास हा सुरक्षेचा मार्ग आहे.
कोणी केलं संधीच सोनं
या संकटात विमा कंपन्या ,खाजगी दवाखाने ,डुप्लिकेट सॅनिटायजर बनविणारे, रेमडीसीवीर कंपनीने ,या इंजेक्शनचा काळाबाजार करणारे, भले मोठे मांडव टाकणारे ,शेकडो खाटा भाड्याने देणारे, मृतदेह पॅकबंद करून त्रयस्तकारावी अंत्यसंस्कार त्रयस्ताकडून करून घेणारे या सर्वानी या जीवघेण्या संधीच सोनं केलं व करत आहेत.याला जबाबदार कोण फक्त आणि फक्त सरकार. कारण याकाळात सामान्य नागरिकाचे सर्व अधिकार संसर्गजन्य आजार प्रतिबंध व आपत्ती व्यवस्थापन कायद्याने सरकारने गोठवून टाकलेले आहेत. त्याचीच किंमत सामान्य माणूस जीव गमावून मोजतोय .
फार लांबट होतंय… पण जाता जाता एक प्रश्न
जेव्हा एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडतो ( महत्वाचं आहे ,टेस्ट करण्याआधी कधीपासून पॉझिटिव्ह आहे हे माहित नाही ) तेव्हा त्याचे नातेवाईक त्याच्या अगदी जवळ असतात.दवाखान्याचा वार्डबॉय किंवा नर्स हि त्याला त्याच्या खाटे पर्यंत घेऊन जातात. ते सुरक्षित असतात मग एक मीटर अंतरावरून चौकशी करणारा PPE किट घातलेला डॉक्टरच कसा काय पॉझिटिव्ह होऊ शकतो ?