निसर्गाचा दे धक्का…
मानवी विकासाचे दुष्परिणाम.
यंदाचा पाऊस समस्त विकास पुरुषांच्या अविवेकी विकासाचा बुरखा फाडणारा ठरला आहे . त्यासोबतच निसर्गाशी बेईमानी केली.याचा हिशोब नियतीने करायला सुरुवात केली.स्वतःच्या स्वार्थासाठी मानवाने निसर्गचक्र बंद पाडण्याचे वा त्याकडे दुर्लक्ष करून मानवाने आपली मनमानी करण्याचे जे पाप केले आहे.त्याचे दुष्परिणाम कालच्या पावसाने समोर आणून दिले आहेत.
अतिक्रमण हीच मोठी आपत्ती
गेल्या तीन चार दशकानंतर चालू वर्षी जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाले.नदी .नाले , ओढे ओसंडून वाहिले .या पाण्याचे मार्ग बाधित झाले,परिणामी वाड्या वस्त्यांवर पाणी साठले. एकूणच पाण्याच्या वहिवाटीवर स्वार्थापोटी जी अतिक्रमणे झाली.यातून पाणी जमिनीत फिरण्याचे ,जिरण्याची मार्ग बंद झाले .शेतातील वरकिणीची वहिवाट मोडीत काढीत शेतकरी इंच इंच जमीन वहितीला आणू लागले.त्यामुळे पाणी साठायला सुरुवात झाली.आधी शेवटच्या शेतात आता आपल्या शेतात असे चित्र या वर्षी अनुभवाला आले आहेत.अगदी सुरुवातीला ज्यांनी हि वहिवाट दाबली ,बंद केली . त्याला त्यावेळी कुणीही थांबवलं नाही .या उलट त्याचा आधार घेत सर्वानी या नैसर्गिक पाणी मार्गावर अतिक्रमणे सुरूच ठेवली. यासोबतच अनेकांनी शेतातली मातीच विकली.त्याचे प्रमाण इतके होते कि तिथे पाणी जिरण्याची नैसर्गिक प्रक्रियाच थांबली .आज तिथे शेत तळे झाले. त्यामुळेही जलजमाव नजरेत भरू लागला.शहरी करणाच्या नावाखाली शहराला ,गावाला मिळणारे नैसर्गिक जल प्रवाह मार्ग पूर्णतः बंद करण्याकडे मानवाची वाटचाल सुरु आहे.यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे नियमित पाऊस झाला तरी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. याला प्रशासकीय दुर्लक्ष म्हंटले तर चुकीचे होणार नाही. याचे दीर्घकालीन परिणाम नागरी जीवनावर होत राहणार आहे .
नागरीकरनासाठीची अतिक्रमण हि जमिनीचा जीव घेत आहे.
शहरीकरणाच्या नावावर नागरीकरण वाढत आहेत . उदयॊग व्यवसाय हे शहराभोवती केंद्रित होत आहे. परिणामी पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते स्वच्छता राहण्यासाठी सिमेंटचा वापर हा इतका वाढला आहे कि , जमिनीला श्वास घेण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यातून जमिनीची पाणी शोषणाची क्रिया बंद पडलीय. त्यामुळे पाणी जमिनीत शोषलेच जात नाहीत. एकतर नैसर्गिक दृष्ट्या जमीन थंड होण्याची अवस्था जवळपास पूर्ण झाली असल्याचे जाणवू लागले आहे.यामुळे भूगर्भ वायू हा संथ होत आहे. अशा या कारणांनी जमिनीवर आता पाणी साठू लागले आहे.प्रशासनाला हि संधी आहे . दर वर्षी गटारीचे कामे काढून ठेके द्यायचे आणि पैसा खायचे.त्यांना निसर्ग व जमिनीवर होत असलेले दुष्परिणामांशी काही देणे घेणे नाही. आणि सरकार चालविणाराना मतासाठी कुणाला दुखावता येत नाही. अर्थात हि सर्व मंडळी निसर्गाशी खेळत आहेत त्याचा न्याय निसर्ग केल्याशिवाय राहणार नाही. तोच आता सुरु आहे.
विकासाने निसर्गावर आघात केला.
सरकार विकास काम करते. दरवर्षी नवनवे ठेके दिले जातात. नवनव्या कंपन्या,गगनचुंबी इमारती ,घरे ,व्हिला बांधली जात आहे. हे सर्व अनियंत्रित ,अविचारी विकास करीत आहेत. सर्व व्यवसाय उद्योग हे शहरात एकवटून अतिरेक केला जात आहे . मानवी अतिक्रमण हि नेहमी निसर्गाच्या मुळावर उठली आहेत .कारण मानव हा असा स्वार्थी जीव आहे. ज्याला जगात एकट्याला राहायचे आहे. त्याला कुठल्याच प्राण्याला या जमिनीवर राहूच द्यायचे नाहीय.हे आपण प्रत्येकाने स्वतःला विचारले तर लगेच उत्तर मिळेल. याच स्वार्थापोटी आम्ही पूर्वी फक्त रस्ते बांधत होतो. आता आम्ही जमिनीच्या पोटात अतिक्रमण केले. व भुयारी मार्ग काढले. शहरीकरण करून गर्दी वाढवली . त्याला दळणवळण वेळापत्रक आधारित जीवन पद्धतीने स्वतःच्या व निसर्गाच्या आरोग्यावर घाला घातला आहे. परिणामी ऑफिसला वेळेवर पोहचवण्यासाठी सरकारी परिवहन यंत्रणा तोकडी पडू लागली. आम्ही स्वतःच्या गाड्यांनी ऑफिस गाठू लागलो. गेल्या दोन दशकात या खाजगी वाहनांची संख्या इतकी वाढली आहे कि ,शहरातले रस्ते कमी पडू लागले .
म्हणून गडकरी सारखे विकास पुरुषांना आपले कल्पक कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. व आम्ही फ्लायओव्हर बांधले व ते वापरायला सुरुवात केली. भुयार करून जमिनीच्या पोटात अतिक्रमण केले . आता या स्वार्थी मानवी स्वभावाने हवेतही बांधकाम करून फक्त स्वतःचे जीवन सुखकर करण्याचा उपाय निवडला. यातही आम्ही समाधानी नाही म्हणून आम्ही आता मेट्रो सारखे व डबल डेकर फ्लायओव्हर बांधायला सुरुवात केली.हे सर्व जमिनीच्या वर जरी असतील तरी याचा थेट संबंध जमीनीशीच आहे. त्याचा पाय त्याला उभारणीसाठी लागणारे सर्व साहित्य दगड ,सिमेंट ,माती,लोखंड हे जमिनीतूनच मिळते. विकासाच्या नावावर सुरु असलेली हि शहरी मानवी अतिक्रमण निसर्गाच्या जीवावर कशी व किती गंभीर आघात करीत आहे या प्रश्नावर कुणी कधी विचार करणार आहेत का ? आता उर्वरित भागातील विचार केला तर आम्ही आता प्रशस्त दिसावं म्हणून बेशिस्ती कडे दुर्लक्ष करून चार ,सहा ,आठ पदरी रस्ते बांधायला सुरुवात केली.या माध्यमातून प्रचंड वृक्ष तोड केली. व निसर्गाचा समतोल बिघडवला. या अमानवीय कृतीचे प्रायश्चित करण्या ऐवजी त्यातून झाडे लावण्याचा नवीन भ्रष्ट मार्ग प्रशस्त करत वांझोटी झाडे आयात करून लावायला सुरुवात केली.
हा सर्व विकास याच वसुंधरेच्या मुळावर घाव घालणारा आहे. याकडे कुठल्याही सरकारचे लक्ष नाही. अर्थात ” जी सरकार शहरातील कचरा खेडोपाडी फेकण्याला पुरस्कृत करतात ” त्यांची अक्कल किती आहे .आणि आम्ही कुणाच्या ताब्यात देश व संस्कृती दिली आहे याचे उत्तर शोधायला भाग पाडणारी हि बाब आहे.
काय करता येऊ शकते ?
या गलथान व अमानवीय जाणीवपूर्वक चूकांच्या बाबत जितकं लिहू तितकं कमी आहे .आम्ही सध्या फक्त आपले स्वतःचे जीवन निघून जाईल किंवा आम्ही जागून जाऊ इतकाच विचार करीत आहोत.पण आपण मूळ जन्माला घातली आहेत.त्यांचं काय ? त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा विचार करायचा नाही हेच आम्ही ठरवलं आहे.
असो ,आत तरी रस्ते बांधताना जिथे झाडे आहेत ती तशीच ठेवून त्याच्या दोन्ही बाजूनी रस्ते करावे. नाहीतरी सरकारने रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे पंधरा मीटर हि रस्त्याची हद्द कायम केली आहे. त्यात आज नागरिक मनसोक्त अतिक्रमण करीत आहेत. ती वाचावीत रस्त्याच्या कडेची झाडे तोडून जो मूर्खपणाचा विकास सुरु आहे. तो थांबवावं लागणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा हद्द किमान ५ मीटरने वाढवावी व ती मोकळी ठेवण्यात जो अधिकारी कसूर करताना आढळेल त्याला बडतर्फ करण्याची कार्यवाहीची तरतूद करावी लागेल .
उद्योगांचे विकेंद्रीकरण करून फक्त शहराच्या भोवताली उभारण्याऐवजी नियोजन करून ग्रामीण भागातील ओसाड जमिनीवर ती कशी उभारता येतील याची नीती बनवली पाहिजे. कि जेणे करून शहरातील जीवघेणी स्पर्धा व निसर्गाशी सुरु असलेला खेळ थांबविण्यास वाव मिळेल.या पर्यायाने गगनचुंबी इमारतीची गरज भासणार नाही.अवैध वाळूउपसा थांबेल.यातून गुन्हेगारीला आळा बसेल. याशिवाय ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होती लोकांचे शहराकडे होत असलेले पलायन थांबेल.
रस्ते निर्मिती साठी व नागरीकरणाच्या सोयी सुविधांसाठी सिमेंटचा कमीत कमी वापर कसा करता येईल यासाठीचे उपाय शोधले व अवलंबले पाहिजे. यात थरावर थर टाकून रस्ते मजबुतीकरण करण्याचा वेडेपणा थांबवावा. यातून मातीची,दगड ,मुरूम यासाठी अवैध उत्खनन थांबेल.
हे सर्व उपाय अगदी प्राथमिक आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला सुखकर करीत निसर्गाशी होणार अमानवीय छळ थांबविणारे आहेत.हे आमच्या विद्वान मानल्या जाणारे सनदी अधिकाऱ्यांना का ? लक्ष्यात येत नाही. किती वर्ष आम्ही निवडून दिलेल्या अकार्यक्षम राजकारणी यांच्यावर हे खापर फोडत आपली सोडवणूक करून घेणार आहोत.
वंदे मातरम.
(हा लेख आपल्या दैनिक ,मासिक ,पाक्षिक ,वेब पेजवर जसाच्या तसा छापण्यास माझी हरकत नाही )
